शीतलटाईम्स - पाकिस्तान विरूध्दच्या अनपेक्षित पराभवाने भारताचे क्रिकेटच हादरले !
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
पाकिस्तान विरूध्दच्या अनपेक्षित पराभवाने भारताचे क्रिकेटच हादरले !
सातव्या टि२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वात बहुचर्चीत भारत व पाकिस्तान शेजारी देशातील सामना आखातातील दुबईत भारताच्या पराभवाने संपन्न झाला. सन १९७५ पासून आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धा सुरू असून यात आतापर्यंत वनडे व टि ट्वेंटी प्रकारात पाकिस्तान भारताविरूध्द कधीही जिंकले नव्हते. ती कमी आज पाकिस्तानने भरून काढत भारताचा टि ट्वेंटी प्रकारातील सर्वात मोठा पराभव करून देशवासीयांना आनंद साजरा करण्याचा मौका दिला.
नाणेफेकीचा महत्वाचा कौल पाकच्या बाजूने लागला तेंव्हाच सामन्यात होणार याची चाहूल लागली होती. कारण पाकने भारताला फलंदाजीस पाचारण केले तेंव्हा सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना त्रास होणार हे स्पष्ट होते व पुढे जात पाकने ते खरेही ठरविले.
भारताच्या डावाच्या सुरुवातीलाच रोहीत शर्मा व केएल राहुल शाहीन शहा आफ्रिदीच्या आत येणाऱ्या चेंडूवर बाद झाले. तर सुर्यकुमार यादवही लगोलग परतला. कर्णधार कोहली व रिषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या खेळात नेहमीसारखा जोश नव्हता. तर रविंद्र जडेजा व खोगीर भरती ठरलेला हार्दिक पांड्या संघाला वाऱ्यावर सोडून परतले. अखेर वीस षटकात भारताने कशाबशा सात बाद एकशे एक्कावन्न धावा जमविल्या. भारताच्या डावा दरम्यान पाकच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजा मोकाट सुटू दिले नाही तर क्षेत्ररक्षणही चांगले केले. शिवाय या सामन्यापूर्वी युएईत नेतृत्व केलेल्या अकरा सामन्यात अपराजित असलेल्या पाक कर्णधार बाबर आझमने अनुभवी कोहलीपेक्षा कित्येक पट प्रभावी नेतृत्व केले.
त्यानंतर केवळ विजय मिळवायचाच या एकमेव उद्देशाने मैदानात उतरलेल्या कर्णधार बाबर व यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांनी भारताच्या कोणत्याच गोलंदाजाला भिक न घालता तसेच कोणतीही पडझङ होऊ न देता विजयी लक्ष साध्य करत भारताविरूध्द विश्वचषकात असलेला विजयाचा दुष्काळ संपविला. कोणत्याही संघाने भारतावर विश्वचषकात मिळविलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.
विश्वचषकात भारतावर अशा नामुष्कीजन्य पराभवाची वेळ येऊ नये व संघातील वातावरण व्यवस्थित राहावा म्हणून खास मेंटॉर म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघासोबत जोडले. मात्र या प्रयोगाचा भारतावर उलटाच परिणाम झाला. खेळपट्टी व वातावरणाचा अभ्यास करून संघ निवडण्यात कर्णधार कोहली, हेडकोच रवी शास्त्री व स्पेशल मेंटॉर धोनी यांचे शिष्टमंडळ संघ निवडण्यातच सफसेल अपयशी ठरले.
सध्या सुपर फॉर्मात असलेला डावखुऱ्या ईशान किशन, अष्टपैलू शार्दूल ठाकूर व अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनला संघाबाहेर बसवून फॉर्मात नसलेल्या अनफिट हार्दिक पांड्याला संघात घेतले. तसेच जुनी धार व लय गमावलेला भुवनेश्वर कुमार व आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेल्या मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला खेळून शास्त्री, धोनी, कोहली यांनी स्वतःचेच हसे करून घेतले. शिवाय देशाची इज्जत मातीमोल केली.
या सामन्यात ना पांडयाची बॅट चालली ना संघ अडचणीत असताना त्याने गोलंदाजी करण्याचे धारिष्ट्य दाखविले. भुवनेश्वरची गोलंदाजी पाकच्या सलामीवीरांनी पोरकट ठरविली तर वरूण चक्रवर्तीची मिस्ट्री हिस्ट्रीत जमा केली.
मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली एमएस धोनी यांनी विश्वचषकात पाकला सातत्याने हरविण्याची सुरू केलेली महान परंपरा कोहलीने मोडीत काढली. इतकेच नाही तर सन २०१७ च्या चँपियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाक विरूद्ध याच कोहलीच्या करंट्या नेतृत्वाखाली भारताला गमवावा लागला. भारताला जर या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर बीसीसीआयने तातडीने त्याला कर्णधार पदावरून हटवावे. तसे तो या विश्वचषक स्पर्धेनंतर संघाचे नेतृत्व सोडणार आहेच. त्यामुळे विश्वविजयाची संधी साधण्यासाठी कोहलीला त्वरीत कर्णधारपदावरून मुक्त करणे संघाच्या फायद्याचेच ठरणार आहे.
एम.एस धोनीच्या नेतृत्वात भारताने सहा टि२० विश्वचषकात नेतृत्व केले त्यातील केवळ एकच स्पर्धा जिंकता आली. तसेच त्याने नेतृत्व केलेल्या दोन पैकी एक वनडे सामन्यांचा विश्वकरंडक जिंकला आहे. त्याचबरोबर एक चॅंपियन्स करंडक जिंकला. धोनीने नेतृत्व केलेल्या दहा आयसीसी स्पर्धांपैकी तिन जिंकल्या असली तरी ही कामगिरी तुलनेने कमीच आहे. शिवाय कोहलीच्या नेतृत्वात सन दोन हजार सतरा व दोन हजार एकोणावीसच्या स्पर्धात तो खेळला आहे. त्यात भारत अपयशीच ठरले होते व या चालू स्पर्धेत धोनी संघासोबत मेंटॉर म्हणून असताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पराभव पत्करावाच लागला ना ? मग धोनीची मेंटॉर म्हणून गरज काय ?
कर्णधाराने संघाच्या हिताचा, तंदुरुस्त व फॉर्मात असलेल्या खेळाडूंचा संघ निवडला व त्यांना योग्य रित्या वागणूक दिली तर कोणताही कर्णधार यशस्वी ठरू शकतो. तेंव्हा कोहली, धोनी, शास्त्री यांची काही एक गरज नाही. भारतीय क्रिकेट रसिकांना कोणत्याही संघाविरूध्द हरलं तर विशेष दुःख होत नाही पण पाकिस्तान विरुद्ध हरणं प्रत्येकाच्या जिव्हारी लागतं. आपला वेळ व पैसा खर्च करून खेळ बघणाऱ्या क्रिकेट रसिकांच्या भावनांचं काय ? तेंव्हा बीसीसीआयने खेळाडूंचे अतिलाड करण्यापेक्षा त्यांना देशवासीयांच्या भावनांची जाणीव करून दयावी.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा