शीतलटाईम्स - कांगारू किवीजवर पडले भारी ; विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे विश्लेषण !
कांगारू किवीजवर पडले भारी ; विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे विश्लेषण !
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
सातवी टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा नवा विश्वविजेता देऊन संपन्न झाली. दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझिलंडला आठ गडयांनी हरवत टि- ट्वेंटीचे स्वतःचे पहिले विजेतेपद मिळविले व अशीच कामगिरी करण्याचे न्युझिलंडचे मनसुबे उधळून लावले. नाणेफेकीने या स्पर्धेत मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकणाऱ्या संघानीच बरेचसे सामने जिंकले. अंतिम सामन्यातही हिच स्थिती राहिल्याने न्यूझिलंडला कसोटी पाठोपाठ टि ट्वेंटीचे विजेतेपद मिळविण्याची संधी हुकली.
संथ सुरुवातीनंतर न्यूझिलंडने कर्णधार केन विल्यमसनच्या कप्तानी डावाने न्यूझिलंडच्या धावसंख्येला मोठा आकार दिला. न्यूझिलंडने दिलेले १७३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या कांगारूंना कर्णधार अरॉन फिंचच्या रूपात पहिला झटका लवकर बसला. मात्र त्यांनतर डेव्हीड वॉर्नर व मिचेल मार्शच्या ९२ धावांच्या भागिदारीने ऑस्ट्रेलियाने सामना आपल्याकडे खेचून आणला.
वॉर्नर ५३ धावांवर बाद झाला तेंव्हा कांगारूंना ४६ चेंडूत ६६ धावा हव्या होत्या. परंतु या खेळपट्टीवर धावा बनविणे इतके मुश्किल नसल्याने मार्शने अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक ठोकत ५० चेंडूत ७७ धावांवर नाबाद राहात सामना, विजेतेपद व सामनावीर पुरस्कारावर कब्जा केला.
दुबईच्या या खेळपट्टीवर न्यूझिलंडने १७२ इतक्या शानदार धावा बनविल्या असल्या तरी ही खेळपट्टी उत्तरोत्तर फलंदाज धार्जिणी होत असल्याने फलंदाजांना मोठे फटके मारणे बिलकुल सोपे जात होते त्यामुळे वॉर्नर, मार्श व मॅक्सवेल यांनी कांगारूंना हे मोठे आव्हानही सहज पार करून दिले.
ईश सोधी हा न्यूझिलंडचा प्रमुख फिरकी गोलंदाज कांगारूंसाठी धोकादायक ठरणार असे सांगितले जात होते. मात्र कांगारूंनी या सामन्यात उतरण्यापूर्वी सोधीच्या गोलंदाजीचा चांगलाच अभ्यास केला असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सोधीच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून आक्रमण करत त्याची लय बिघडून टाकली परिणामत: त्याच्यावर दबाव वाढला. याचा फायदा कांगारूंनी चांगल्यापैकी उठवत सोधीच्या चार षटकात ४० धावा लुटल्या शिवाय त्याला एकही बळी मिळू दिला नाही.
ट्रेंट बोल्ट शिवाय फिरकी जोडी मिचेल सँटनर या गोलंदाजांवर न्यूझिलंडच्या यशाची प्रमुख भिस्त होती. बोल्टने आपली जबाबदारी योग्य प्रकारे पाडताना चार षटकात केेवळ १८ धावा देत दोन बळीही मिळविले. मात्र सोधी व सँटनर जोडीचा पुरा फडशा पाडत कांगारूंनी दोघांच्या आठ षटकात ६३ धावांची लयलूट करत किवीजला विजेतेपदापासून रोखले.
आक्रमक सलामीवीर म्हणून प्राप्त मार्टीन गप्टील या सामन्यात कमालीचा संथ खेळला.पावर प्ले मध्ये त्याची बॅट अतिशय थंड होती. त्याने ३५ चेंडू खेळून मात्र २८ धावा केल्या. येथे जर गप्टील तडफेने खेळला असता तर न्यूझिलंडला दोनशे धावा सहज काढता आल्या असत्या. गप्टीलच्या निष्प्रभ खेळाने न्यूझिलंडची सुरुवातीलाच पिछेहाट झाली होती हे मात्र नक्की !
दुबईच्या मैदानावर नाणेफेक महत्वाची असताना प्रथम फलंदाजी करणारे संघ हरण्याचा इतिहास मोठा असल्याने फिंचने किवीजला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझिलंडची सुरुवात खराब झाली. त्यांच्या १० षटकात मात्र ५७ धावा झाल्या होत्या तरीही भारताप्रमाणे हातपाय न गाळता न्यूूझिलंडने हिमतीने सामना करत शेवटच्या दहा षटकात ११५ धावा कुटून संघाला सुस्थितीत आणले. त्याचबरोबर टिट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही आपल्या नावे केला.
न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन या संपूर्ण स्पर्धेत बिलकुल फॉर्मात नव्हता, त्याचा स्ट्राईक रेटही १०० च्या आत होता. परंतु या महत्वाच्या सामन्यात त्याच्यातील मोठा खेळाडू जागा झाला व ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी त्याने २३१.०३ च्या स्ट्राईक रेटने साकारली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण खूपच ख़राब झाले. मार्टीन गप्टील व विल्यमसनचे झेल त्यांनी डावाच्या सुरुवातीलाच सोडलेे, त्यामुळे न्यूझिलंंडला १७२ धावा करता आल्या. वास्तविक गप्टील जीवदानाचा मोठा फायदा घेऊ शकला नाही. मात्र विल्यमसनने याचा पुरेपुर फायदा उठविला. अन्यथा डेव्हीड कॉनवेच्या अनुपस्थितीमुळे आधीच कमकुवत झालेली न्युझिलंडची अवस्था आणखीच बिकट झाली असती.
याशिवाय न्यूझिलंडचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कने अतिशय स्वैर मारा करताना चार षटकांच्या कोटयात १५ च्या सरासरीने ६० धावा देत न्यूझिलंडला एक प्रकारे मदतीचा हातच दिला. स्टार्कने या दरम्यान एक नोबॉल व दोन वाईड चेंडू टाकले. मिचेल मार्श व मॅक्सवेल यांनी ४ षटकात ३९ धावा दिल्या नाहीतर किवीज १५० धावाही काढू शकले नसते. पण हेजलवुड व कमिन्सने आठ षटकात ४३ धावा देत ३ बळी घेत आपले कार्य व्यवस्थित पार पाडले.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा