शीतल टाईम्स //-दिव्यांगांना स्वावलंबनाचा नवा हात श्रीरामपूरमध्ये कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोफत वितरण; शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शीतल टाइम्स प्रतिनिधी
दिव्यांगांना स्वावलंबनाचा नवा हात
श्रीरामपूरमध्ये कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोफत वितरण; शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीरामपूर : "स्वबळावर स्वतःचे काम करण्याचा आनंद हा अद्वितीय आहे." अशी भावना श्रीरामपूर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी व्यक्त केली. दिव्यांग बांधवांसाठी आयोजित मोफत कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स वितरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या शिबिराच्या माध्यमातून ज्यांना चालण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज होती, त्यांना आता स्वतःच्या पायांवर उभं राहण्याची संधी मिळाली आहे. तसेच, दिव्यांग बांधवांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊन, आत्मनिर्भर होण्याची ऊर्जा प्राप्त झाली आहे. या शिबिरात मोजमाप घेऊन तात्काळ साहित्य वाटप करण्यात आले. तहसीलदार वाघ यांनी सांगितले की महसूल किंवा इतर कोणत्याही विभागाचे प्रश्न त्वरित सोडविले जातील, अशी ग्वाही यावेळी दिली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी सांगितले की, प्रशासनामार्फत विविध योजना दिव्यांगांसाठी राबविल्या जातात. ग्रामपंचायतीकडून व पंचायत समितीमार्फत पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवण्यात येतो. या निधीतून विविध उपक्रम राबवले जातात आणि याचा लाभ अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिराचे आयोजन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) कानपूर, एस. आर. ट्रस्ट, रोटरी मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र, व पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
उद्घाटन प्रसंगी अलीमको टीमचे प्रमुख यशस चुंबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के, मनसुखलाल चोरडिया, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार विनोद पाटणी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे तालुका समन्वयक संजय साळवे, मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी, आसान दिव्यांग संघटनेचे मुस्ताकभाई तांबोळी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे पीओ बाळासाहेब सातपुते, प्रमोद आडे, प्रफुल गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि साहित्य मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. कार्यक्रमात 'एक पेड मा के नाम' या उपक्रमांतर्गत मान्यवरांचा औषधी रोपे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, चोरडिया यांच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक संजय साळवे यांनी केले व आभार प्रदर्शन दीपक तरकासे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश सालपे, सौ. कौशल्या जाधव, सुरज गायकवाड, नागनाथ शेटकर, मुकिंद गाडेकर, सुनील कानडे, विश्वास काळे, सौ. स्नेहा कुलकर्णी, सौ. वक्ते, वंदना उदमले, कुसुम शितोळे, तसेच मूकबधिर विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा