शीतल टाईम्स //- जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात व प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ भारतीय स्वाभिमानी संघ मैदानात
शीतल टाइम्स प्रतिनिधी
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात व प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ भारतीय स्वाभिमानी संघ मैदानात
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या जनसुरक्षा कायद्याचा निषेध आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीने श्रीरामपूर तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. या आंदोलनाच्या अनुषंगाने महामहीम राज्यपालांना उद्देशून निवेदन तहसीलदार मार्फत सादर करण्यात आले.
प्रशासनाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार राजेश पऊळ यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा सचिव सुधाकर बागुल, युनायटेड मुस्लिम फोरमचे जिल्हाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, फ्रान्सिस शेळके, बबन शेलार, गौस तांबोळी, अंतोन भरपूरे, नंदू कदम, संजय वाहूळ, रवी बोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या –
- महाराष्ट्र शासनाने लागू केलेला जनसुरक्षा विधेयक २०२५ हा कायदा रद्द करावा.
- हा कायदा शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मौलिक अधिकारांवर गदा आणणारा असून तो संविधानाच्या अनुच्छेद १४, १९ व २१ च्या विरोधात आहे.
- प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दि. १३ जुलै रोजी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.
- या प्रकरणात सराईत गुन्हेगार दिपक काटे व त्याच्या साथीदारांवर "मकोका" कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी.
- या हल्ल्याच्या पाठीमागे असलेल्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
निवेदनात असा इशाराही देण्यात आला आहे की, जर दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. के. रेकवाल, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल दांडगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समविचारी संघटनांच्या सहभागाने राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
📸


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा