शीतल टाईम्स //-श्रीरामपूरमध्ये भारतीय स्वाभिमानी संघाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर रविवार दि. २० जुलै रोजी
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीरामपूरमध्ये भारतीय स्वाभिमानी संघाचे दि २० रोजी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर येथील आगाशे सभागृह, टिळक वाचनालय, मेन रोड येथे रविवार, दिनांक २० जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात भारतीय कर्मचारी संघाचे राष्ट्रीय प्रचारक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन विद्रोही सांस्कृतिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे यांच्या हस्ते होणार आहे. महापुरुषांच्या संघर्षातून बहुजन समाजाला मिळालेले हक्क आणि अधिकार आज सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. मिळवलेले अधिकार जपण्यासाठी निश्चित उद्दिष्ट, संघटित प्रयत्न आणि प्रामाणिक नेतृत्व आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या शिबिरामध्ये समाजातील जागृती करणे, संघटन निर्माण करणे आणि सामाजिक परिवर्तन घडवणे या दृष्टीने मार्गदर्शन होणार आहे. बहुजन समाजातील प्रत्येकाने तन, मन व धनाने सहभाग घेऊन या उपक्रमात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय कर्मचारी संघ, भारतीय स्वाभिमानी संघ, युनायटेड मुस्लिम फोरम, महामानव विचार प्रबोधन समिती, बहुजन समन्वय समिती आदी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा