शीतल टाईम्स //- कचरा व्यवस्थापन संदर्भात बेलापूर बु. ग्रामपंचायतीत महत्त्वपूर्ण बैठक
शीतल टाइम्स प्रतिनिधी
🌿 कचरा व्यवस्थापन संदर्भात बेलापूर बु. ग्रामपंचायतीत महत्त्वपूर्ण बैठक
बेलापूर (वार्ताहर) – बेलापूर-ऐनतपूर गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची शक्यता असल्याने, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या बैठकीत बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे, कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रमुख शशिकांत दुशिंग, प्रेरणा ठाणगे, अनिता पाचपिंड, ॲड. अरविंद साळवी, आरोग्य विभागाचे दत्तात्रय वक्ते व अविनाश शेलार यांची उपस्थिती होती.
बैठकीत बोलताना उपस्थितांनी सांगितले की, मागील काही वर्षांत कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीसाठी शेतीमंडळाची जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीवर कचरा डंपिंग यार्ड तयार करण्यात येणार आहे.
गावातील ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नागरिकांनी घराघरातून ओला व सुका कचरा, प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, भाजीपाल्याचे अवशेष वेगवेगळे करून ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले. ओल्या कचऱ्यात प्लास्टिक मिसळल्याने कचऱ्याचे योग्य प्रकारे विघटन होत नाही आणि दुर्गंधी वाढते, त्यामुळे नागरिकांनी याबाबत अधिक जबाबदारीने वागावे, असे बैठकीत ठरविण्यात आले.
या उपक्रमात महिला बचत गट, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीत गोळा केला जाईल व नंतर नियोजित डंपिंग यार्डमध्ये त्यावर प्रक्रिया केली जाईल.
यामुळे भविष्यात कचरा विल्हेवाटीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, गावात स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सर्व संबंधित घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
"बेलापूर बु. ग्रामपंचायतीत आयोजित बैठकीत ग्राम पंचायत पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी — कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी एकत्रित चर्चा करताना."
शीतल टाईम्स प्रतिनिधी 🌱📰


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा