शीतल टाईम्स //- प्रवरा नदीवरील पुलाचे तुटलेले कठडे ठरतय अपघाताला निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष
शीतल टाइम्स प्रतिनिधी
प्रवरा नदीवरील पुलाचे तुटलेले कठडे ठरतय अपघाताला निमंत्रण!
नागरिकांतून दुरुस्तीची मागणी; प्रशासनाचे दुर्लक्ष
बेलापूर बुद्रुक (श्रीरामपूर) श्रीरामपूर-अहिल्यानगर रस्त्यावरील बेलापूर बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील पुलाचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
प्रवरा नदीवरील हा पूल अत्यंत वर्दळीचा असून, श्रीरामपूर, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि आसपासच्या अनेक गावांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे अनेक लहान मोठ्या वाहनांची या पुलावर येजा असते. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी ऊसतोड कामगारांचे बिऱ्हाड घेऊन जाणारा एक ट्रक धूसर प्रकाशात पुलाचा अंदाज न आल्याने कठडे तोडून थेट नदीपात्रात कोसळला होता. या अपघातानंतर आजपर्यंत कठड्यांची दुरुस्ती झालेली नसून ते आजही तुटलेल्या स्थितीत आहेत.
विशेषतः रविवारी, बेलापूर बुद्रुक येथील आठवडे बाजारामुळे या पुलावर मोठी गर्दी होते. नदीपलीकडील बेलापूर खुर्द, नरसळी, बन, केसापूर, दवणगाव, आंबी अशा अनेक गावांतून नागरिक बाजारहाटासाठी बेलापूर बुद्रुकला येतात. त्यामुळे या दिवशी मोठ्या आणि लहान वाहनांची प्रचंड वर्दळ असते.
तुटलेल्या कठड्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत वाढले आहे, त्यामुळे तुटलेले कठडे सहजासहजी लक्षात येत नाहीत. यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात तर वाहनचालकांना पुलाचा अंदाज घेणे अधिकच अवघड होते. स्थानिक नागरिकांनी अनेकदा या धोकादायक स्थितीबद्दल प्रशासनाला कळवले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने तात्काळ या पुलाच्या कठड्यांची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
********************************
********************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
** साप्ताहिक शीतल टाईम्स **
R.N.I.NO.MAHMAR/2003/13182
- बातम्या व जाहिरातीसाठी
*********-संपर्क-**********
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********* मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********* मो. 9273729867
*******************************
*******************************



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा