शीतल टाईम्स //-कु. दर्शना पापडीवाल यांना बॅटरीवर चालणारी सायकल देत साधले सामाजिक दायित्व!
शीतल टाइम्स प्रतिनिधी
कु. दर्शना पापडीवाल यांना बॅटरीवर चालणारी सायकल देत साधले सामाजिक दायित्व!
श्रीरामपूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी):
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विशेष सहकार्याने आज श्रीरामपूर येथील कु. दर्शना पापडीवाल या दिव्यांग तरुणीला बॅटरीवर चालणारी सायकल प्रदान करण्यात आली.
कु. दर्शना पापडीवाल या ८० टक्के दिव्यांग असलेल्या तरुणीस यापूर्वी साधी सायकल देण्यात आली होती. मात्र तिच्या शारीरिक स्थितीमुळे ती सायकल चालवणं कठीण जात होतं. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयाचे वैद्यकीय सामाजिक अधिकारी श्री. संजय साळवे यांच्याकडे श्री. महेश दिघे यांनी बॅटरीवर चालणारी सायकल उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
साळवे यांनी तत्काळ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक डॉ. दीपक अनाप यांच्याशी संपर्क साधून बॅटरीवर चालणारी सायकल उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे आज कार्यालय बंद असतानाही डॉ. अनाप यांनी तातडीने कार्यवाही करत सायकल सुपूर्द केली.
संजय साळवे यांनी कु. दर्शना हिला खाजगी नोकरी मिळवून देऊन तिच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनात मोलाचा सहभाग दिला आहे. बॅटरीवर चालणारी ही सायकल तिच्या रोजच्या कामासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि तिच्या आत्मनिर्भर जीवनासाठी ती एक महत्त्वाची सोय ठरली आहे.
या उपक्रमामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. अभिजीत दिवटे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, विशाल पापडीवाल, समन्वयक सृजन भालेराव, डॉ. अभिजीत मिरेकर आणि प्रवीण कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
- शीतल टाईम्स न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा