शीतल टाईम्स //- जलजीवन योजनेमुळे झालेल्या रस्ते खोदाईची तातडीने दुरुस्ती करा – नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
शीतल टाइम्स प्रतिनिधी
जलजीवन योजनेमुळे झालेल्या रस्ते खोदाईची तातडीने दुरुस्ती करा – नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
शिर्डी (प्रतिनिधी) –
जलजीवन मिशन अंतर्गत राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर खोदाई करण्यात आली आहे. या रस्त्यांची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करावी, अशा स्पष्ट शब्दांत आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलजीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिर्डीत झालेल्या आढावा बैठकीत नाम. विखे पाटील यांनी जलजीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा प्रगती अहवाल मागवला. जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांमध्ये प्रलंबित कामांची माहिती सादर करावी, तसेच योजनेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी समवेत पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पाणीपुरवठा योजनांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदले गेले असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांवर रोष व्यक्त केला जात आहे, जो त्यांचा दोष नसतानाही सहन करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी जलजीवन प्राधिकरणाने खोदाई झालेल्या रस्त्यांची माहिती घेऊन तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्याचा आहवाल सादर करावा, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, जलजीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा