शीतल टाइम्स //- बेलापूर ग्रामसभेत घरकुल लाभार्थ्यांच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 

शीतल टाइम्स प्रतिनिधी



बेलापूर ग्रामसभेत घरकुल लाभार्थ्यांच्या मागणीवरून प्रचंड गदारोळ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बेलापूर (प्रतिनिधी) – “घरकुल लाभार्थ्यांना एक गुंठा जागा नावावर करून द्या” या मागणीवरून बेलापूरच्या ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला. सुरुवातीला झालेली तु-तु मैं-मैं, हमरा-तुमरी अशी जोरदार बाचाबाची अखेर माईकची ओढा-ओढ आणि गोंधळात परिवर्तित झाली. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. जवळपास पाच तास चाललेल्या या वादानंतर अखेर सुनील मुथा यांच्या मध्यस्थीने वाद शांत झाला.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी घेण्यात येणारी ग्रामसभा यंदा बेलापूर ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच सौ. मीनाताई साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेवरून चर्चा रंगली. माजी सरपंच भरत साळुंके व बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी, “योजनेचे अधिकारी व ठेकेदार ग्रामसभेला उपस्थित का नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. रस्त्याच्या मधोमध टाकलेले पाईप भविष्यात गळती झाल्यास रस्त्यांचे पुन्हा उत्खनन करावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यावर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी लवकरच ग्रामसभा घेऊन, अधिकारी, पत्रकार व गावातील नागरिकांना बरोबर घेऊन  पाहणी दौरा करून त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर बालविवाहमुक्त गाव, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, कर आकारणी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. देविदास देसाई यांनी सत्यमेव जयते ग्रुपतर्फे रस्त्यालगत वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव ठेवला. सुधीर नवले यांनी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती बंधनकारक असतानाही ते अनुपस्थित असल्याची खंत व्यक्त केली. मारुती राशिनकर यांनी झेंडा चौकातील ध्वजस्तंभामुळे अपघातांचा धोका असल्याचे सांगून त्याचे स्थानांतर करण्याची सूचना केली.

ग्रामसभेत घरकुल विषयावरून वातावरण तापले. माजी सरपंच महेंद्र साळवी यांनी घरकुल लाभार्थ्यांना दिली जाणारी जागा, मंजूर घरकुलांची संख्या याबाबत माहिती मागितली. त्यावर अभिषेक खंडागळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला अर्धा गुंठा जागा मिळणार असल्याचे सांगितले. मात्र, महेंद्र साळवी यांनी “घरकुल मिळालेल्यांकडून पैसे मागितले जात आहेत, भ्रष्टाचार चालू आहे” असा गंभीर आरोप केला.

यानंतर शरद नवले यांनी या आरोपांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी साळवी, नवले व साळुंके यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. लाभार्थ्यांकडून प्रत्येकी एक लाख सात हजार रुपये मागितल्याचा आरोप साळवी यांनी केला. त्यावर ग्रामस्थ, विशेषतः गायकड वस्तीतील महिलांनी “आमच्या नावावर एक गुंठा जमीन सातबारा उताऱ्यासह द्यावी; आम्ही कुठलेही पैसे देणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली.

वाद चिघळताच माईकची ओढा-ओढ झाली, दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तरीही नागरिकांनी प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन सुरू केले.

दुपारी तीनच्या सुमारास सुनील मुथा ग्रामसभेच्या ठिकाणी  आले व ग्रामविकास अधिकारी लहारे, शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला. विक्रम नाईक यांसारख्या ग्रामस्थांनी आपले प्रश्न अद्याप अनुत्तरीत असल्याचे सांगितले. त्यावर खंडागळे यांनी सर्व प्रश्नांना लेखी उत्तर दिले जाईल, असे आश्वासन दिले.

पत्रकारांशी बोलताना शरद नवले म्हणाले, “आम्ही कुणालाही एक लाख रुपये मागितलेले नाहीत. ही केवळ विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही.”

तर सुधीर नवले यांनी, “गावातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामे आम्ही खपवून घेणार नाही. घरकुलाप्रमाणेच इतर सर्व कामांमध्ये निविदा प्रक्रियेचे पालन करावे,” अशी मागणी केली.





********************************
********************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

** साप्ताहिक शीतल टाईम्स **

R.N.I.NO.MAHMAR/2003/13182

 - बातम्या व जाहिरातीसाठी
 *********-संपर्क-**********

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********* मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********* मो. 9273729867  

*******************************
*******************************


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव