शीतल टाईम्स //-बेकायदा सावकारीवर लगाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सक्रिय २१ सावकारांवर गुन्हे दाखल; नियमबाह्य सावकारांकडून कर्ज घेऊ नका – प्रशासनाचा इशारा
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेकायदा सावकारीवर लगाम ; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सक्रिय
२१ सावकारांवर गुन्हे दाखल; नियमबाह्य सावकारांकडून कर्ज घेऊ नका प्रशासनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या सावकारी व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अंमलबजावणीसाठी ही समिती सक्रियपणे काम करणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बेकायदा सावकारी करणाऱ्या २१ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईला अधिक बळकटी देण्यासाठी ही समिती महत्त्वाची ठरणार आहे.
बैठकीत शेतकरी, व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आले की, केवळ परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. तसेच, सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार व्याजाचे दर फलक स्वरूपात स्पष्टपणे लावणे बंधनकारक आहे. तक्रार असल्यास ती कोठे करावी, याची माहितीही स्पष्टपणे फलकावर नमूद करावी, असे निर्देश देण्यात आले.
बेकायदा सावकारी, जादा व्याज आकारणी, वसुलीसाठी होणारा त्रास यासंदर्भात नागरिकांनी आपले नाव गोपनीय ठेवून सहकार विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही बैठकीतून करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा