शीतल टाईम्स //- श्रीक्षेत्र बेलापूर ही हरिहराची पावननगरी, संतांची पवित्र भूमी - महंत भास्करगिरी महाराज
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीक्षेत्र बेलापूर ही हरिहराची पावननगरी, संतांची पवित्र भूमी - महंत भास्करगिरी महाराज
बेलापूर (ता. श्रीरामपूर) : श्रीक्षेत्र बेलापूर परिसर ही केवळ धार्मिक नगरी नसून ती हरिहर केशव-गोविंद महाराजांच्या त्रिस्थळीमुळे पावन तिर्थक्षेत्र ठरली आहे. याचबरोबर राष्ट्रसंत गोविंददेवगिरीजी महाराज यांची ही जन्मभूमी असल्याने ती संतांचीही पवित्र भूमी असल्याचे गौरवोद्गार देवगड देवस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांनी काढले.
बेलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री हरिहर केशव-गोविंद भगवानांच्या प्रीत्यर्थ आयोजित ज्ञानयज्ञ व भागवत कथा सप्ताह सोहळ्यास महंत भास्करगिरी महाराजांनी नुकतीच भेट दिली. यावेळी उपस्थित भाविकांना संबोधित करताना त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमावेळी ह.भ.प. सोपान महाराज हिरवे, ह.भ.प. शुभम कांडेकर, ह.भ.प. कृष्णा महाराज शिरसाठ, बाळू महाराज कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ताहाराबाद देवस्थानचे ह.भ.प. अर्जुन महाराज तनपुरे यांनीही रविवारी सोहळ्यास सदिच्छा भेट दिली.
महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, "बेलापूरसह बन व उक्कलगाव येथे केशव-गोविंद महाराजांची मंदिरे आहेत. या त्रिवेणी संगमामुळे श्रीक्षेत्र बेलापूर हे तिर्थस्थळ मानले जाते. येथे त्रिस्थळी केल्यास काशीचे पुण्य मिळते, अशी धारणा आहे. विशेष म्हणजे, रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंदगिरीजी व्यास महाराज यांची ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे, म्हणूनही बेलापूर ही संतांची पवित्र भूमी ठरते."
कार्यक्रमपूर्वी महंत भास्करगिरी महाराजांनी श्री केशव-गोविंद भगवानांचे सश्रद्ध दर्शन घेतले. प्रवचनासाठी विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सोहळ्याचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी श्री हरिहर केशव-गोविंद महाराज सप्ताह समिती, श्री हरिहर महिला भजनी मंडळ, श्री विठ्ठल भजनी मंडळ, संत सावता महाराज भजनी मंडळ तसेच युवक मंडळाने विशेष परिश्रम घेतले.
या सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
- मंगळवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सायं ५ वा. भव्य शोभायात्रा.
- बुधवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. विद्याविभूषण ह.भ.प. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे काल्याचे कीर्तन, महाआरती आणि महाप्रसाद.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा