शीतल टाईम्स //-शेतकरी भक्तांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो! महंत रामगिरीजी महाराज यांना शेतकरी संघटनेचे साकडे
शीतल टाइम्स प्रतिनिधी
शेतकरी भक्तांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो!
महंत रामगिरीजी महाराज यांना शेतकरी संघटनेचे साकडे
प्रतिनिधी, शिरजगाव :
तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर येथील मौजे शनिदेव गावाजवळील सराला बेट येथे साराला बेट संस्थानचे मठाधिपती पूजनीय रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने हरिनाम सप्ताहास भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद व प्रसाद घेतला. यावेळी महाराजांच्या चरणी लीन होत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब अधिक, डॉ. विकास नवले, संतोष पटारे, इंद्रभान चोरमळ, दिलीप औताडे, शैलेश वमने, राजेंद्र चोरमळ, राहुल चोरमळ, अकबर शेख, ठकचद आढाव, गोरख पवार, कडू पवार, नारायण पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आपण ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या अध्यात्मिक वारशाचे कार्य करत आहात. आपल्या समाज प्रबोधनाच्या कार्यामुळे राज्यभरातील हजारो भक्तांना नवचैतन्य लाभत आहे. गेल्या चार दशकांपासून शेती व्यवसाय तोट्याचा ठरत असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अंधकारमय झाले आहे. परिणामी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील निवडणुकीत अनेक साधू-संतांनी व शेतकरी संघटनांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. सत्तेत आल्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कर्जमुक्ती झाली नाही.”
पुढे निवेदनात म्हटले आहे की, “आपली वाणी प्रभावी आहे. आम्ही आपल्याला काही सांगण्याइतपत नाही. परंतु एक शेतकरी भक्त म्हणून, आपण सरकारकडे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीबाबत प्रबोधन करावे, ही नम्र विनंती आहे. आपण केलेल्या प्रबोधनामुळे सरकारला परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि सामान्य शेतकरी सुखी व सन्मानाचे जीवन जगू शकेल.”

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा