शीतल टाईम्स //-श्रीरामपूर - बेलापूर रस्त्याच्या दुभाजकातील झाडांची दयनीय अवस्था
शीतल टाइम्स प्रतिनिधी
श्रीरामपूर - बेलापूर रस्त्याच्या दुभाजकातील झाडांची दयनीय अवस्था
श्रीरामपूर (शीतल टाईम्स प्रतिनिधी) – श्रीरामपूर–बेलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करून या रस्त्याच्या दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली असली तरी, सध्या या झाडांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. झाडांना पाणी दिले जात नसल्याने अनेक झाडे सुकून गेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) या बाबतीत पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.
रस्त्याच्या सौंदर्यासाठी लावण्यात आलेल्या या झाडांची देखभाल आणि संगोपनाचे काम कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराने देखभाल वेळच्यावेळी न केल्याने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी अथवा सुपरव्हिजन न केल्याने ही झाडे निष्काळजीपणाचे बळी ठरत आहेत. परिणामी, शासनाचा निधी वाया जात असून, झाडांच्या रूपाने सार्वजनिक मालमत्तेची हानी होत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीचेही नियोजन करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी टेंडर प्रक्रियाही राबवली आहे. मात्र, पावसाळा संपत आला तरी वृक्ष लागवडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे ही वृक्ष लागवड यंदा होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, सदर वृक्ष लागवड करताना भविष्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाचा विचार करून योग्य अंतर राखून लागवड करणे आवश्यक आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा अशा योजनांची पुनरावृत्ती केवळ कागदावरच मर्यादित राहील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा