शीतल टाइम्स //- बेलापूरच्या पत्रकार भावनासाठी जागा देऊ - शरद नवले
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूरच्या पत्रकार भावनासाठी जागा देऊ - शरद नवले
बेलापूर (प्रतिनिधी)
“पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून मला संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्षपद दिले आहे. या पदाच्या माध्यमातून निराधार, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत पत्रकारांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे,” असे प्रतिपादन मा. जि.प. सदस्य शरद नवले यांनी केले.
संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बेलापूरातील पत्रकारांच्या वतीने शरद नवले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी सरपंच मीनाताई साळवी, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार मारोतराव राशीनकर, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, सुहास शेलार, दिलीप दयमा, अरविंद साळवी, बाबुराव पवार, ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवले पुढे म्हणाले की, “बेलापूरातील पत्रकार हे नेहमी जागृत राहून चांगल्या गोष्टीला पाठिंबा देतात, तसेच काही चुका झाल्यास त्या निदर्शनास आणून देतात. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावाला साडे ४२ एकर जमीन दिली असून त्यात घरकुल वसाहतीसोबतच पत्रकार भावनासाठी जागा देण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भास्कर खंडागळे म्हणाले की, “बेलापूरला तालुका पातळीवरील पद मिळाल्याचा आनंद आहे. ज्यांना अशी संधी मिळते त्यांनी ती गावच्या विकासासाठी वापरली पाहिजे.”
ज्येष्ठ पत्रकार मारोतराव राशीनकर यांनी आपला मनोगत व्यक्त करताना, “नवले हे सामान्यांचे नेते असून ते सदैव जनतेच्या प्रश्नांवर लढतात. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपद हे सहसा आमदारांना मिळते, पण ते नवले यांना मिळाल्याने त्यांच्या भविष्यातील आमदारकीची दारे खुली झाली आहेत,” असे मत व्यक्त केले.
पत्रकार देविदास देसाई यांनी पत्रकार भावनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याबद्दल शरद नवले यांचे आभार मानले. तर पत्रकार विष्णुपंत डावरे यांनी नवले यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा