शीतल टाइम्स //- बेलापूर बुद्रुक येथे गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर बुद्रुक येथे गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न
बेलापूर (वार्ताहर)
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील नाव घाट या ठिकाणी श्री. गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन मिरवणुकीतून उत्साहात संपन्न झाले.
या सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका शांततेत व शिस्तीत पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
प्रवरा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष काळजी घेतली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत पिशव्या वेगळ्या गोळा करण्यात आल्या.
या ठिकाणी बेरिकेटिंग, लाईटिंग, आरतीसाठी टेबल आदी सुविधा करण्यात आल्या होत्या. सकाळी दहा ते रात्री एक वाजेपर्यंत सलग पंधरा तास ग्रामपंचायत, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी तळ ठोकून कार्यरत होते.
सोहळ्याची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी माजी जि. प. सदस्य शरद नवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे व त्यांचा मित्रपरिवार, सुप्रभात ग्रुप, सत्यमेव जयते संस्था, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामस्थ व मान्यवरांनी बेलापूर ग्रामपंचायतीचे अभिनंदन करून प्रशासनाचे आभार मानले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा