शीतल टाईम्स । - बेलापुरातील गुप्तधनाबाबत सीआयडी चौकशी करण्याची मनसेची मागणी ; सोमवारी उपोषण श्रीरामपूर प्रतिनिधी

  





बेलापुरातील गुप्तधनाबाबत सीआयडी चौकशी करण्याची मनसेची मागणी ; सोमवारी उपोषण 

श्रीरामपूर प्रतिनिधी

    बेलापूर गावात सापडलेल्या गुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावणाऱ्या लोकांसह अधिकाऱ्यांची 'सीआयडी'मार्फत चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 'मनसे'चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदेंसह मनसैनिकांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या गुप्तधनाची, गुप्त विल्हेवाट लावणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाई करून, गुप्तधन सापडलेले ठिकाण व परिसर शासनाने ताब्यात घ्यावा या मागणीसाठी सोमवारी ( दि.२६ ) बेलापूर ग्रामपंचायतीसमोर 'मनसे'च्या उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी माध्यमांना दिली.


'मनसे' जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गुप्तधनाची गुप्तपणे विल्हेवाट लावणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून हा परीसर शासनाने ताब्यात घेवून तेथे खोदकाम चालु करावे. या परीसरात याअगोदरही एकदा-दोनदा गुप्तधन सापडल्याची चर्चा आजूबाजूतील लोक करत आहेत. सर्व गुप्तधन ताब्यात घेवून त्याचा बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी वापर करावा, असे म्हंटले आहे.


बलापूर गावाला खूप जुना इतिहास असून,  गावात अनेक जुने वाडे आहेत. अशाच एका ठिकाणी जुन्या वाड्याच्या पाठीमागे गार्डन मध्ये झाडे लावण्याचे कामासाठी खोदकाम चालु असतांना एक तांब्याचा हंड्यामध्ये सदर गुप्तधन सापडले. त्यामध्ये वर चांदीचे नाणे व खाली सोन्याचे नाणे होते. हा हंडा चार जणांना ही उचलत नव्हता, असे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी वृत्तवहिनीला मुलाखत देतांना सांगितले.


दरम्यान, या गुप्तधनाची गुप्तपणे विल्हेवाट लावणारांनी खोदकाम करणाऱ्या व प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या लोकांना आमिष दाखवून दमदाटी करुन त्यांचे जबाब बदलून खोटे प्रतिज्ञापत्र बनवून घेण्यात आले असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी म्हटले आहे. पंचनाम्याच्या वेळेस खोदाई करणाऱ्या लोकांच्या जबाब का घेतले नाही? असा सवाल  उपस्थित करून त्याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. जाणूनबाजून त्यांचे जबाब घेतले नसले तर, पंचनामा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कर्तव्यात कसूर केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. खोदकामाच्या तारीख व शासनास सांगितलेली तारीख यामध्ये तफावत आहे. खोदकाम करणारे व्यक्तीने सांगितले की, वटसावित्री पोर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दि. २४/६/२०२१ रोजी खोदकाम झाले. परंतु, जागा मालक सांगतात की, दि. ५/७/२०२१ रोजी सदर धन सापडले. आणि ही माहिती श्रीरामपूर येथील तहसिलदार यांना दि. १३/७/२०२१ रोजी कळवली. त्यानंतर दि. १४/७/२०२१ रोजी प्रशासनाने पंचनामा केला. त्यामध्ये एका कळशीत फक्त चांदीचे नाणे सापडल्याचे दाखविले. प्रशासनाला दिलेल्या तारखांमध्ये व खोदकाम करणाऱ्या मजुरांनी दिलेली मुलाखत व लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोठी तफावत आहे. 

गुप्तधन ज्यांच्याकडे सापडले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठविले आहे. शासकीय अधिकाऱ्याने गुप्तधन सापाडणाऱ्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे वागणे म्हणजे संशयाचे कारण तयार झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतल टाईम्स - बेलापूर पोलिसांनी मोटरसायकल चोरास पकडले शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी

शीतल टाइम्स प्रतिनिधी 📰 इंद्रनाथ पाटील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ग्रामस्थांकडून निषेध

शीतल टाईम्स//बाजार समितीच्या वाटचालीत योगदान असणाऱ्या नामदार विखेंचा विसर! बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार शीतल टाईम्स श्रीरामपूर प्रतिनिधी