शीतल टाईम्स //- “निर्मल वारी”मुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर — १० वर्षांच्या प्रयत्नांना यश ✍🏻 शीतल टाईम्स प्रतिनिधी | अहिल्यानगर
शीतल टाइम्स प्रतिनिधी
“निर्मल वारी”मुळे वारकऱ्यांचा प्रवास सुखकर — १० वर्षांच्या प्रयत्नांना यश
✍🏻 शीतल टाईम्स प्रतिनिधी | अहिल्यानगर
पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा. दरवर्षी लाखो वारकरी टाळ, मृदुंग आणि हरिपाठाचा जयघोष करत दिंडीद्वारे पंढरपूरला पायी वारी करतात. मात्र या प्रवासात अनेक वेळा स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असल्यामुळे वारीच्या मुक्कामी वारकऱ्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व अनारोग्याचे वातावरण निर्माण होत होते.
ही गंभीर समस्या ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस्था यांनी २०१५ पासून ‘निर्मल वारी’ या उपक्रमाची सुरुवात केली. यामागील उद्देश स्पष्ट होता – वारी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी करणे.
🚻 फिरते शौचालय आणि उत्कृष्ट व्यवस्थापन
विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत यंदा राज्य शासनाच्या मदतीने तब्बल २६५ फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले. या शौचालयांचे व्यवस्थापन, देखभाल आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वयंसेवकांनी समर्थपणे पार पाडली.
सेवा सहयोग संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे शेकडो स्वयंसेवक गेल्या १० वर्षांपासून या उपक्रमात सातत्याने कार्यरत आहेत. पालखीच्या प्रत्येक मुक्कामस्थळी शौचालये लावणे, वापराचे प्रबोधन करणे, स्वच्छता राखणे यासाठी तंत्रशुद्ध नियोजन करण्यात येते.
✅ वारकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
ज्येष्ठ स्वयंसेवक जाधव यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षांत उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण ८०% नी घटले आहे. वारकरी आणि दींडी चालक यांच्याकडून शौचालय वापरासाठी जागरुकता निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थही आता या उपक्रमात सहभाग घेत आहेत.
🙏 आदित्य एंटरप्रायझेसचा मोलाचा वाटा
यंदाच्या पालखी सोहळ्यात आदित्य एंटरप्रायझेस कंपनीने शौचालय व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडली. कंपनीचे संचालक विक्रम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शौचालये वेळेवर पोहोचवणे, स्वच्छता राखणे, पाण्याची सोय करणे अशा अनेक बाबी कुशलतेने पार पडल्या. यामुळे एकाही वारकऱ्याला गैरसोयीचा सामना करावा लागला नाही, असे समाधानकारक चित्र यंदा पाहायला मिळाले.
🌱 ‘निर्मल वारी’चा सकारात्मक परिणाम
वरील उपक्रमामुळे फक्त वारकऱ्यांचाच नव्हे तर गावकऱ्यांचाही आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. पालखी मुक्कामी पसरणारे रोगराईचे प्रमाण जवळपास नाहीसे झाले आहे.
आज “वारी” फक्त अध्यात्मिक नाही, तर स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचे प्रतीक बनली आहे. हे परिवर्तन शक्य झाले आहे ते निर्मल वारी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे!
वारकरी म्हणतात - “आता आमची वारीही निर्मल झाली!”


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा